Lok Sabha election 2024 : विदर्भात महायुतीला जबर धक्का

Lok Sabha election 2024 : विदर्भात महायुतीला जबर धक्का

[author title="राजेंद्र उट्टलवार" image="http://"][/author]

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या आणि पक्षांतर्गत गटबाजीत भाजप-सेना महायुतीच्या ताब्यात गेलेल्या विदर्भाने यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसला 'हात' दिला असून, राज्यात फाजील आत्मविश्वासातून '45 पार'चा घोषा लावणार्‍या महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. सामान्यांप्रश्नी दुर्लक्ष, नेत्यांच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळल्याचे सिद्ध झाले.

एकवेळ तर मतमोजणी होत असताना संघ मुख्यालयी नागपुरात भाजप नेते नितीन गडकरी विदर्भात एकमेव आघाडीवर होते. इतर नऊ जागा हातून गेल्यात जमा असताना तिहेरी लढतीत अकोल्यात निर्णायक क्षणी मुसंडी मारल्याने भाजपचे अनुप संजय धोत्रे आणि बुलडाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी महायुतीची लाज राखली. मात्र, गेल्यावेळी 10 पैकी 8 जागा जिंकणार्‍या महायुतीला यावेळी 3 तर काँग्रेसला 5, शरद पवार राष्ट्रवादी गटाला 1 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 1 अशा महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या. कधीकाळी वज्रमूठ निर्धार सभा आणि अलीकडच्या काळात 'है तय्यार हम…' महारॅलीच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीचा संघ मुख्यालयी, दीक्षाभूमीच्या नागपुरातून शंखनाद करणार्‍या काँग्रेसला, नागपूर मविआला वैदर्भीय मतदारांनी दिलेला हा बूस्टर डोस नक्कीच आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संजीवनी देणारा आहे.

गडचिरोलीत पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची तयारी दर्शविणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप-सेनेशी किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी थेट भिडून 15 वर्षांनंतर रामटेकचा गड काँग्रेसकडे आणणारे माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, अमरावतीत राणा दाम्पत्यांशी सरळसरळ पंगा घेणार्‍या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि नागपुरात थेट पंतप्रधानपदाचे दावेदार नितीन गडकरी यांच्याविरोधात दंड थोपटणारे आमदार विकास ठाकरे या नेत्यांचे हायकमांडकडे वजन वाढले आहे. नवनीत राणा यांना पराभूत केल्याने प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची मविआशी जवळीक आता भविष्याचा वेध घेता पुन्हा वाढू शकते. विदर्भातील मतदार संघनिहाय विचार करता गेल्यावेळी राज्यात चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकमेव विजय काँग्रेसला मिळाला. यावेळी चंद्रपूरसोबतच वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक, अमरावतीचे मतदान काँग्रेसच्या पदरात पडले.

विदर्भातील लक्षवेधी लढतींचा विचार करता शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची सेना अशा रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ या तीन मतदार संघात लढती झाल्या. नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा थेट लढती झाल्या, तर अकोला अमरावती आणि बुलढाणा या तीन मतदार संघात तिहेरी लढती झाल्या. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडून येणारा आणि पराभूत करू शकणारा असेच मतदारांनी मतदान केले. यामुळेच विदर्भात हाताने कमळ, धनुष्य दूर सारले आणि अनोळखी असूनही तुतारीही वाजली.

नागपुरात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्यापुढे लढण्यास कुणीही इच्छुक नसताना काँग्रेसचे शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी तुल्यबळ आव्हान उभे केले. 'जितेगा विकास…' या टॅगलाईनभोवती नागपूरची निवडणूक रंगली. लोकांनी गडकरींच्या विकासाला प्राधान्य दिले. शहरातील सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा मतटक्का वाढल्याने भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. 2014, 2019 च्या तुलनेत गडकरींच्या मताधिक्यात 2.86 लाखवरून 1.37 लाखपर्यंत घसरण पाहायला मिळाली. कदाचित गडकरींच्या जागी दुसरा उमेदवार असता, तर भाजपला येथेही पराभवाचा धक्का निश्चित दिसला असता.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजप नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार इच्छुक नसताना पक्षाने त्यांना पुढे केले. मात्र, काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट लढतीत मुनगंटीवार यांचा 2.60 लाख मतांनी एकतर्फी दारुण पराभव केला. विकास की सहानुभूती, यात मतदारांनी चंद्रपूर आणि रामटेकला काँग्रेसला झुकते माप दिले.

पटेल यांना धक्का

दुर्गम, नक्षलग्रस्त गडचिरोली लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार अशोक नेते यांची हॅट्ट्रिक काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी मोठ्या मताधिक्क्याने रोखली. गेल्यावेळी काँग्रेस उमेदवार असलेले डॉ. नामदेव उसेंडी यांना ऐनवेळी भाजपने दुपट्टा घालूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात खा. प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा धक्का म्हणता येईल. भंडार्‍यात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यापुढे ऐनवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी दिलेल्या, विरोधकांनी डमी म्हणून हिणवलेल्या काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तगडे आव्हान निर्माण करीत लीलया विजय संपादन केला. पटोले-प्रफुल्ल पटेल आणि वडेट्टीवार या तिघांचीही पद, प्रतिष्ठा या दोन मतदार संघातील निकालावर अवलंबून होती.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांच्या हाती शिवसेनेचे धनुष्य देण्याचा भविष्याच्या रणनीतीतून भाजपचा डाव यशस्वी झाला असला, तरी रामटेकचा गड शिवसेनेपासून दूर गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या या मतदार संघात काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे यांची उमेदवारी, तसेच जात प्रमाणपत्रावरून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्याने देशभरात चर्चेत आली. कधीकाळी पंतप्रधान नरसिंहराव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदार संघाने कुणीही उमेदवार, कसाही लादला जाऊ शकत नाही, हे स्पष्ट करीत यावेळीही धक्कादायक निकाल दिला. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंना हा धक्का बसला.

नवनीत राणा पराभूत

जात प्रमाणपत्रावरूनच बहुचर्चित विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या हाती महायुतीत प्रचंड विरोध असताना भाजप हायकमांडने 'कमळ' दिले. मात्र, काँग्रेसतर्फे आमदार बळवंत वानखेडे यांनी तगडे आव्हान देत त्यांना जोरदार धक्का दिला. आमदार बच्चू कडू यांनी महायुतीशी घरठाव असताना दिनेश बुब यांच्या निमित्ताने दिलेला चेकमेट राणा यांचा पराभव निश्चित करून गेला.

अकोला लोकसभा मतदार संघात मविआशी फारकत घेणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तिसर्‍या क्रमांकावर गेले. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे अशी जोरदार लढत झाली. निर्णायक क्षणी मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळाला.

वर्धा मतदारसंघ काँग्रेसचा असताना व सामाजिक समीकरण, परंपरागत लढतीत भाजपचे रामदास तडस यांना काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या रूपाने शरद पवार गटाने हाती तुतारी देत संसदेत जाण्यापासून रोखले.

दरम्यान, यवतमाळ-वाशिम मतदार संघात खा. भावना गवळी, संजय राठोड यांना डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना दिलेली उमेदवारी चुकीचा निर्णय होता, हे सिद्ध झाले. फार पूर्वी उमेदवारी जाहीर झाल्याने कठोर परिश्रमातून निष्ठेची मशाल पेटवत उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख भारी पडले.

विदर्भातील शेवटच्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेची बुज (शिंदे गट) राखली. ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवीकांत तुपकर व वंचितचे वसंत मगर यांनी उभे केलेले आव्हान त्यांनी मोडीत काढत या मतदार संघात हॅट्ट्रिक साधली आहे. विदर्भातील निवडणुकीत राम मंदिर, कलम 370 अशा राष्ट्रीय मुद्द्यांवर दहा वर्षांतील मोदी सरकारने केलेल्या विकास कामांवर भाजपचा भर असला, तरी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, लोकशाही रक्षण, महागाई, बेरोजगारी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर दिला गेलेला भर जनतेला भावला. 2014 आणि 2019 च्या तुलनेत यावेळी मोदीविरोधात लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका विदर्भातील भाजप, महायुतीच्या उमेदवार, खासदारांना चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, अमरावती, वर्धा येथे बसू शकतो, असा अंदाज आपण यापूर्वीच वर्तविला, तो तंतोतंत खरा ठरला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news