

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: संघ मुख्यालयाचा अंतर्भाव असलेल्या पूर्व विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopde) यांना देखील दिल्लीवरून बोलतोय, असे सांगत शर्मा नामक एका व्यक्तीने मंत्रीपदाची ऑफर दिली होती. स्वतः खोपडे यांनी आज (दि.२१) अनेक महिन्यांनी हे वास्तव उघड केल्यानंतर आमदारांना गंडा घालणारे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
विविध प्रांतातील तब्बल 28 आमदारांना मंत्री पदाचे आमिष देत फोन करणाऱ्या महाठग नीरज राठोडचा या शर्माशी काय संबंध आहे, की तोच वेगवेगळ्या नावाने बोलत होता, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. महाठग नीरज राठोडची पोलीस कोठडी 22 मेरोजी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याचवेळी तीन आमदारांनी पैसे दिल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांत तक्रारीसाठी अजूनही कुणी आमदार पुढे (MLA Krishna Khopde) आलेले नाहीत.
नीरजच्या बँक खात्यांची देखील चौकशी पोलिस करणार आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांना फोन करणाऱ्या शर्मा नामक व्यक्तीने मधुर संभाषण करीत पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याच नावाचा वापर केला हे विशेष. वेळोवेळी मंत्रीपदाने हुलकावणी मिळाल्याने आमदार कृष्णा खोपडेदेखील आजवर गप्प राहिले. शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले नाव नक्की झाले आहे. मात्र, अध्यक्ष जे सांगतील ते तुम्हाला करावे लागेल, असा निरोप या व्यक्तीने त्यांना दिला होता. आपल्याला पाच वेळा फोन आले. मात्र, अशा पद्धतीने भाजपमध्ये मंत्री होत नसतात, हे आपल्या लक्षात आल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा त्याचे फोन येणे बंद झाले, असे खोपडे यांनी आज स्पष्ट केले. आता आमदार कुंभारे यांच्या तक्रारीनंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसात जाण्याचे सांगितल्याने एकेक आमदार पुढे येत आहेत.
कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी देखील आपल्याला फोन आल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दरम्यान ठकबाज नीरज राठोड विरोधात पोलीस तक्रार करणारे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.वेळ पडल्यास इतरही आमदारांचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. आमदार विकास कुंभारे आणि नीरज राठोड यांच्यातील फोन संभाषणमधील आवाज आणि शर्मा यांचा आवाज बोलण्याची लकब यात अंतर असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले. एकंदरीत देशभरातील विविध प्रांतातील आमदारांना थेट मंत्री करण्याचे आमिष देत भाजप हाय कमांडच्या नावाचा वापर करणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान आता पोलीस यंत्रणेपुढे आहे.
हेही वाचा