

Tiroda Leopard Attack
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील एकोडी जवळ असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडकी समोरील घराच्या अंगणातून बिबट्याने शिवशंकर रहगड़ाले यांच्या ४ वर्षीय बालकाला उचलून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.९) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. परिसरातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर काही अंतरापर्यंत जाऊन बिबट्याने त्या मुलाला सोडून दिले. मात्र, त्या निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने वनविभागाबद्दल रोष नागरिकात दिसून येत आहे.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हियांश हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.
खडकी व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आज एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित कुटुंबाला तात्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.