'एनएनटीआर'च्या जंगलात जखमी वाघाची डरकाळी; वाघासह छाव्याचा मृत्यू

Navegaon Nagzira National Park | जखमी वाघावर वन विभागाच्या पथकाची नजर
Navegaon Nagzira project new tiger
वाघांच्या वर्चस्वाच्या लढाईत नागझिऱ्यातील टी-९ वाघासह एका छाव्याचा मृत्यू झाला.Pudhari Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : एनएनटीआरच्या जंगलात नव्या वाघामुळे निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत नागझिऱ्यातील प्रस्थापित टी-९ वाघासह एका छाव्याचा मृत्यू झाला. असे असतानाच या झुंजीत नवीन वाघदेखील जखमी झाला असून नागझिरा व्याघ्र प्रकल्पातच या जखमी वाघाचे वावर आहे. तर प्रकल्पाला लागून असलेल्या गावातील पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना पुढे आल्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभाग व वन्यजीव विभागाकडून या वाघाचा शोध घेण्यात येत आहे.

नवेगाव-नागझिरा प्रकल्पात नव्या वाघाची एंट्री

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात एका नव्या वाघाने एंट्री केली असून आता हा वाघ नागझिऱ्याच्या जंगलात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला २२ सप्टेंबर रोजी नागझिरा सहवनक्षेत्रातील नियतक्षेत्र नागझिरा-१, कक्ष क्रमांक ९६ थाडेझरी परिसरात नागझिऱ्याचा राजा म्हणून ओळख असलेल्या टी-९ या वाघाचा मृतदेह आढळून आला होता. तर सलग दुसर्‍या दिवशी याच गाभा क्षेत्रात कक्ष क्रमांक ९९ मध्ये टी-४ वाघिणीच्या दोन वर्षीय छाव्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. दरम्यान वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक तथा उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्यासह वन विभागाचे पथक व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपद्धतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शवविच्छेदनानंतर दोन्ही वाघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तर पाहणीत दोन्ही वाघांचा मृत्यू नव्याने आलेल्या वाघासोबत झालेल्या झुंजीत झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या वाघांच्या झुंजीत नव्याने आलेला वाघही जखमी झाल्याची माहिती असून आता नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी, गोविंदपुर, बुचाटोला, बोदलकसा, व कोडोबर्रा परिसरात या वाघाचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच हा वाघ जखमी असल्याने हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसून परिसरातील दोन-तीन गावांत हिंस्त्र प्राण्यांने पाळीव जनावरांची शिकार केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वन विभाग व वन्यजीव विभागाकडून जखमी वाघाचा शोध घेण्यात येत असून या परिसरात वन विभागाच्या पथकाकडून पाळत ठेवली जात आहे.

इतर छाव्यांचा जीव धोक्यात !

नवीन वाघ एखाद्या जंगलात प्रवेश करतो तेव्हा त्या जंगलात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तेथील प्रस्थापित प्रमुख वाघासोबत लढाई करून त्याला ठार करतो. तर त्यानंतर त्या जंगलातील इतर छाव्यांनाही ठार करून आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. अशी समज आहे. तेव्हा, टी-९ वाघासह त्याच्या छाव्याला ठार केल्यानंतर या वाघाच्या रडारवर जंगलातील इतर वाघिणींचे छावे देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एनएनटीआरच्या जंगलातील इतर छाव्यांवरही आता नागझिरा सोडून इतरत्र जाण्याची वेळ आली आहे.

वन विभागाच्या चमूची नजर

जखमी वाघाचा वावर या परिसरात असल्याच्या बाबीला वन्यजीव विभागाने दुजोरा दिला. तसेच या वाघावर वन विभागाची चमू नजर ठेवून आहे. कॉलर आयडी, पगमार्कवरून वाघाचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांनी सतर्क रहावे...

सध्या या वाघाचा वावर नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील व तिरोडा तालुक्यातील मंगेझरी, रुस्तमपूर, गोविंदपूर, रुस्तमपूर, बुचाटोला, या बोदलकासा व कोडोबर्रा या परिसरात आहे. तेव्हा नागरिकांनी सावध रहावे, कुठेही विशेषतः रात्रीच्या सुमारास घराबाहेर जाऊ नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Navegaon Nagzira project new tiger
गोंदिया जिल्ह्यातील ५६९ ज्येष्ठ नागरिक करणार तीर्थक्षेत्रांची वारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news