

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित शंकरनगरातील सरस्वती विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल ही विना परवानगी काढण्यात आल्याचे चौकशी अहवालात उघड झाल्याने आता शिक्षण विभागामार्फत संस्थेला पत्र दिले जाणार आहे. या बसचा अपघात होऊन त्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. 45 पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या गंभीर प्रकरणाची माध्यमिक शिक्षण विभागाकडून उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिका-यांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यामध्ये शाळेने शिक्षण विभागाच्या विना परवानगीच सहल आयोजित केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यासाठी जबाबदार मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश एका पत्राच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडून साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिका-यांना देणार असल्याची माहिती आहे.
मंगळवारी २६ नोव्हेंबरला सरस्वती विद्यालयाच्या शाळेची ६ बसमधून बोरधरण येथे ही विद्यार्थ्यांची सहल जात होती. हिंगणा तालुक्यातील पेंढरी गावाजवळील वळणावर एमएच ४० वाय ७४५० क्रमांकाच्या बसच्या चालकाचे बसवरून नियंत्रण सुटले. आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या २० फूट खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात दोन शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी असे ५२ जण जखमी झाले होते. तर एका विद्यार्थिनीचा मृत्यूही झाला. जखमींना तातडीने उपचारार्थ एम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांवर किरकोळ शस्त्रक्रियाही झाली.
या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी (ईओ) रोहिणी कुंभार यांनी उपशिक्षणाधिकारी (डीईओ) संतोष सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. त्या समितीने सविस्तर चौकशी करून शुक्रवारी (दि. २९) नोव्हेंबरला आपला अहवाल कुंभार यांच्याकडे सादर केला आहे. त्या अहवालामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहल नेताना शिक्षण विभागाकडे त्यासंदर्भातील कुठल्याही प्रकारची लेखी स्वरुपातील परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सहलीसाठी नेण्यात येणारी बस ही खासगी होती. शासन निर्णयानुसार शालेय सहलीसाठी एसटी बस नेणे अनिवार्य असताना हा नियम शाळेने मोडलेला आहे. याशिवाय इतरही काही गंभीर बाबी या चौकशी अहवालातुन पुढे आल्या आहेत.