

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या रिंगरोड राणी अवंतीबाई चौकात एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.१२) सकाळी ८. ३० च्या सुमारास ही घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शीनुसार सदर भरधाव ट्रक ने महिला शिक्षिकेला काही अंतरापर्यंत चिरडत नेले. यात शिक्षिकेच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत मुख्य रस्त्यावर अवैध फलक लावणारे व वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Gondia Accident News)
अल्विना जेम्स लुईस (वय ३१, रा. अरिहंत कॉलनी, कुडवा, गोंदिया) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या तालुक्यातील अंभोरा येथील शाळेत कार्यरत होत्या. दरम्यान, आज, सकाळी त्या दुचाकीवरून (एमएच ३१ व्ही ४१५३) शाळेत जात असताना अवंतीबाई चौकात भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. तर काही अंतरापर्यंत चिरडत नेले. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी एकत्र झालेले नागरिक शहरातील वाहतूक व्यवस्था आणि या चौकात लावण्यात आलेल्या अवैध फलकामुळे वळण घेताना निर्माण झालेली अदृश्यतेला कारणीभूत ठरवीत होते. तणाव वाढत असल्याचे पाहून रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक व चालकाला ताब्यात घेतले. त्यामुळे हा तणाव निवळला. शिक्षिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघातानंतर या चौकातील परिस्थिती बघितली असता परिसरात मोठ्या प्रमाणात तथाकथीत एका युवा नेत्यांचे वाढदिवस शुभेच्छा देणारे अनधिकृत फलक लागले आहेत. या फलकामुळे या चौकातून वळण घेताना दुसरीकडून येणारे वाहन दिसून येत नाही. त्यातच या चौकात असलेला सहयोग हॉस्पीटलला लागून मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेऊन अर्धा रस्ता व्यापला जातो, त्यामुळे देखील येथील रहदारीला त्रास होत असतो.
गेल्या काही दिवसापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतूक विभागाला निवेदन दिले होते. तर वाहनावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही विभागाला जाग आली नाही आणि आज त्याच परिसरात हा अपघात घडून आला. दरम्यान, अपघातानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दहा मिनिटं कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला होता. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी पोचले व इथे दोन ते तीन दिवसात ट्राफिक सिग्नल लावण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर शरदचंद्र पवार गटाने हे आंदोलन मागे घेतले.