गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथील शाळेवर शिक्षकांअभावी बंद होण्याची वेळ आली आहे. या धरतीवर विद्यार्थांच्या अध्ययनाचा भार स्वयंसेवकांवर आहे. तेव्हा शाळेला पूर्णवेळ शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी करत सोमवारी (दि.२) सडक अर्जुनीच्या पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
चिचटोला येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून शाळेची पटसंख्या ३८ आहे. शाळेमध्ये दोन शिक्षक व दोन स्वयंसेवक कार्यरत होते. मात्र, एका शिक्षकाची पदोन्नती बदली व दुसरे शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने आता शाळा स्वयंसेवकांच्या भरवश्यावर सुरू आहे. विशेष म्हणजे, शाळेला सन २००७ मध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार आणि सन २०२३ मध्ये अदानी फाउंडेशन तर्फे सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाले आहे. तसेच या शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून सानेगुरुजी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाले आहे.
मात्र, कालांतराने शाळेला उतरती कळा लागली असून येथील एक शिक्षक निवृत्त झाल्यावर तर दुसरे शिक्षक इतरत्र बदलून गेल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेला पुर्णवेळ शिक्षकच देण्यात आले नाही. त्यामुळे आता शाळेतील विद्यार्थी स्वयंसेवकांच्या भरवश्यावर विद्यार्जन करीत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेला तात्काळ शिक्षक देण्यात यावे या मागणीला घेवून आज, विद्यार्थ्यांनी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. तर तात्पुरते शिक्षकाची व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.