Congress Party News: मी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाही; आमदार सहषराम कोरोटे यांचे स्पष्टीकरण  | पुढारी

Congress Party News: मी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाही; आमदार सहषराम कोरोटे यांचे स्पष्टीकरण 

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप आले आहे. त्यात त्यांच्यासोबत विदर्भातील काही आमदार जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव/देवरी मतदार संघाचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, आपण कॉंग्रेस सोडून कुठेच जाणार नसल्याचे आमदार कोरोटे यांनी स्षट केले आहे.

सोमवारी दिवसभरातील राजकीय घडामोडींनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. गेली अनेक दिवस अशोक चव्हाण काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आज, त्यांच्या राजीनाम्याने तसे चित्रही स्पष्ट होऊ लागले आहे. तर पुढील दोन दिवसांत ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यात आता अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्यातील विशेषतः विदर्भातील कोण कोणते नेते काँग्रेस सोडणार, या चर्चेने जोर धरला आहे. किमान 12-15 आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव/देवरीचे काँग्रेसचे एकमेव आमदार सहषराम कोरोटे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, आमदार कोरोटे यांनी आपण कॉंग्रेसचे निष्ठावान आहोत.
अशोक चव्हाण यांच्यासोबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली भेट झाली होती, त्यानंतर आपली भेट झाली नाही. ते कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत, मुख्यमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांनी हा निर्णय कसा का घेतला हे आपल्याला माहिती नाही. तसे ते स्पष्ट करतीलच मात्र, आपण कॉंग्रेसचे शिपाई आहोत. त्यामुळे आपण कॉंग्रेससोबतच असून कुणासोबतच कुठेही जाणार नसल्याचे आमदार सहषराम कोरोटे यांनी आज प्रसार माध्यमापुढे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांना सद्यातरी विराम लागले आहे.

Back to top button