

Porla Forest Range
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात ४५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली. बाळू विठ्ठल राऊत, असे मृताचे नाव आहे.
राऊत हे बुधवारी मशरूम आणण्यासाठी जंगलात गेले होते. ते घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी जंगल परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरीचे पोलिस निरीक्षक सचिन झनक तसेच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीही भेट देऊन राऊत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मृत बाळू राऊत यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. मोलमजुरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु वाघाने त्यांना ठार केल्याने कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
परिसरात वाघाचा वावर असल्याने वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेमुळे वसा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाने मनुष्यावर हल्ला करण्याची पोर्ला वनपरिक्षेत्रातील या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १३ सप्टेंबरला शेतात खत टाकत असताना भाऊराव म्हशाखेत्री यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. परंतु म्हशाखेत्री यांनी हातातील प्लॉस्टिकचा टब घेऊन वाघाचा प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला. यानंतरची ही दुसरी घटना आहे.