Gadchiroli News | आश्रमशाळेतील सर्पदंशप्रकरणी फरार संस्था सचिव विश्वजित कोवासे यांना अटक!

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, महिनाभरापासून होता फरार
फरार संस्था सचिव विश्वजित कोवासे
फरार संस्था सचिव विश्वजित कोवासे
Published on
Updated on

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी महिनाभरापासून फरार असलेले संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा ही काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्थेद्वारे संचालित केली जाते. १० ऑगस्टच्या मध्यरात्री विषारी सापाने दंश केल्यामुळै दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनू कोरेटी या तीन विद्यार्थिंनींचा मृत्यू झाला, तर तीन विद्यार्थिनी गंभीर आजारी झाल्या. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते.

चौकशीअंती पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव अॅड.विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार व अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार व भास्कर भोयर यांना अटक करण्यात आली, तर भाग्यश्री चिलमवार, मारोतराव कोवासे आणि विश्वजित कोवासे फरार होते.

अखेर संस्था सचिव विश्वजित कोवासे यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज कोवासे यांना गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांतकुमार सिंह यांनी 'पुढारी' ला दिली.

मारोतराव कोवासे, भाग्यश्री चिलमवार अजूनही फरारच

दरम्यान, संस्थाध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे व मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार हे अजूनही फरार आहेत. लवकरच ते पोलिसांपुढे आत्मसमर्पण करतील, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news