Tukaram Mundhe ashram schools food safety
गडचिरोली : राज्यातील आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा आणि विद्यार्थी वसतिगृहांमध्ये अन्नसुरक्षा व मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीने ३१ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या मोहिमेत सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा आणि विद्यार्थी वसतिगृहांची जोखीम आधारित तपासणी करण्यात येणार आहे. अन्न तयार करणे, साठविणे, प्रक्रिया अथवा वितरण करणाऱ्या प्रत्येक संस्थेकडे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत आवश्यक अन्न परवाना किंवा नोंदणी आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघर, भोजनगृह व अन्नसाठवण क्षेत्रातील स्वच्छता, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्नपदार्थांसाठी योग्य साठवण व्यवस्था, स्वच्छ भांडी व उपकरणांचा वापर, कीटक व उंदीर नियंत्रण तसेच कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली जाणार आहे.
याशिवाय अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले जाते का आणि त्यांना सुरक्षित अन्न हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे का, याचीही खात्री केली जाणार आहे. अन्नधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, तेल, फळे, भाजीपाला यांसह इतर अन्नपदार्थ केवळ अन्न सुरक्षा व मानकांनुसार अधिकृत पुरवठादारांकडून किंवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी केले जातात का, हे तपासले जाणार आहे.
संशयास्पद अथवा उच्च जोखीम असलेल्या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींनुसार प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास सुधारणा सूचना देण्याबरोबरच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विशेष तपासणी मोहिमेत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मुख्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांत आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे प्रकरणही ताजे आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन विभागाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.