

गडचिरोली : बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकास वाटेत लुटणाऱ्या तीन जणांना सावरगाव पोलिसांनी अटक केली आहे. तिघांकडून देशी बनावटीच्या २ बंदुका, ११ काडतुसे, मोटारसायकल आणि चोरी केलेला मोबाईल जप्त केले आहेत.
अशोक सुखराम बोगा(३०), घुमनसाय बैजूराम गावडे(३३) व सुकालू आसाराम कोमरा(३२) अशी आरोपींची नावे असून, तिघेही धानोरा तालुक्यातील गजामेंढी येथील रहिवासी आहेत. २१ जुलैला रामभरोसे सीताराम हा ट्रक घेऊन प्रवास करीत असताना सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चिखलात फसला. त्यामुळे रात्री तो ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपला. ही संधी साधून मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी ट्रकचालक रामभरोसे सीताराम यास उठवून त्यास बंदुकीचा धाक दाखवला. आधी त्यांनी डिझेल काढण्याची धमकी दिली. परंतु डिझेल काढता न आल्याने त्यांनी रामभरोसेच्या छाती आणि डोक्यावर बंदूक ठेवत जबरदस्तीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावला.
कुणाला सांगितल्यास जिवे मारु, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. रामभरोसे सीताराम याच्या फिर्यादीवरुन मुरुमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य समजून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तत्काळ वेगाने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सावरगाव पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक पुरावा व साक्षदारांच्या मदतीने एकाच दिवसांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल करुन त्यांच्याकडील दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंतकुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी आपणाकडे दिल्याचे सांगितले. त्यामुळे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. धानोरा येथील न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, गोकुळ राज, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे, राजेंद्र कोळेकर, हवालदार वानखेडे, अंमलदार तुलावी, काळबांधे, श्रीरामे, लेखामी व करसायल यांनी ही कारवाई केली.