

गडचिरोली : चितळाची शिकार करुन त्याचे मांस शिजविणाऱ्या पाच जणांवर आलापल्लीच्या वनाधिकाऱ्यांनी वनगुन्हे दाखल केले असून, आरोपींची वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रेखा दिवाकर वनकर (५५),संजय गोविंदा कोटरंगे(२५),अनिल राजन्ना बोलेम (४०), भानय्या बुचय्या जंगीडवार (६२) व अमोल गणपत ठाकरे (३५) अशी आरोपींची नावे आहेत.
९ जुलैला आलापल्लीच्या वनाधिकाऱ्यांनी नागेपल्ली येथील एफडीसीएम वसाहतीतील रेखा दिवाकर वनकर यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरी शिजवलेले मांस आढळून आले. चौकशीत त्यांनी ते चितळाचे मांस असल्याची कबुली दिली. हे मांस संजय गोविंदा कोटरंगे याच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासात कोटरंगे यानेही स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर अनिल बोलेम, भानय्या जंगीडवार व अमोल ठाकरे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या सर्व आरोपींनी चितळाचे मांस खरेदी किंवा विक्री केल्याचे उपविभागीय वन अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार तसेच उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार, वनक्षेत्रपाल नारायण इंगळे, गौरव गणवीर, वनपाल सहारे,गोवर्धन,बुद्धावार, तुराणकर आणि वनरक्षक राव व दहागावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोणताही वन्य प्राणी अथवा पक्षी पाळणे, विकणे, खरेदी करणे, शिकार करणे किंवा त्यांचे अवयव बाळगणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास तत्काळ १९२६ (Hello Forest) या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.