

Nambala Keshav Rao killed in Chhattisgarh Encounter
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील अबुडमाडच्या जंगलात आज (दि.२१) सकाळी तेथील डीआरजी पोलिस दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत देशातील नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता, पॉलिट ब्युरो सदस्य तथा माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसव राजू ठार झाला. नंबालावर दीड कोटी रुपयांचे बक्षीस होते. आजपर्यंतच्या इतिहासात छत्तीसगड पोलिसांना मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे. या चकमकीत संध्याकाळपर्यंत २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावापासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावर अबुझमाडचे जंगल सुरु होते. या जंगलात नक्षल्यांचे मोठे नेते एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि कोंडागाव येथील पोलिसांच्या डीआरजी चमूच्या जवानांनी अबुझमाडच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास प्रारंभ केला. आज सकाळी डीआरजी जवानांशी झालेल्या चकमकीत नंबाला केशव राव उर्फ बसव राजू ठार झाला. या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे.
छत्तीसगड पोलिसांनी सर्वोच्च नक्षली नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवरुन छत्तीसगड पोलिसांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. आजचा दिवस हा नक्षलवाद निर्मुलनाच्या लढाईतील मैलाचा दगड ठरणारा आहे. देशाच्या नक्षलवादाविरुद्धच्या लढाईतील मागील ३० वर्षांत पोलिसांनी माओवाद्यांच्या राष्ट्रीय महासचिवास कंठस्नान घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत मोदी सरकारने नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प सोडल्याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला आहे.