

Jawan Deepak Madavi Funeral Gadchiroli
गडचिरोली : छत्तीसगड राज्य व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान दीपक मडावी यांच्या पार्थिवाला आज (दि.६) दुपारी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली.
सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८) यांचे पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या पटागंणावर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दीपक यांना मानवंदना दिली.
याप्रसंगी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दीपक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर डॉ.सिंगल यांनी दीपकच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दीपक मडावी यांनी विपरीत परिस्थितीत नक्षल्यांशी धैर्याने लढा दिला. मात्र, त्यांना वीरमरण आले. शासन दीपकच्या कुटुंबीयांसोबत असून, त्यांना सर्वप्रकारची मदत करेल, असे आश्वासन डॉ.सिंगल यांनी दिले.
यावेळी दीपक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक शोकमग्न झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अहेरी तालुक्यातील दामरंचा या मूळ गावी रवाना करण्यात आले.
शहीद जवान दीपक मडावी यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना वातावरण शोकाकूल झाले होते. दीपक यांच्या १० वर्षीय मुलाने नातेवाईकाच्या कडेवर बसून आपल्या वडिलांच्या पार्थिवाला सॅल्यूट केला, तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. दीपक यांची वृद्ध आई श्रद्धांजली वाहताना बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार केले.