

गडचिरोली : कोरची तालुक्यातील बोगाटोला येथील जंगलात अर्धवट अवस्थेत पुरलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शानू पठाण (३६), पुंकेश बोरकर(३२), चंद्रशेखर गुज्जेवार (२७), धनपाल मडावी (२१) (सर्व रा.जांभुळखेडा) व सोनाली कंवर(२५)रा.जेठकन्हार, छत्तीसगड अशी आरोपींची नावे आहेत. ३१ जानेवारीला बोगाटोला येथील जंगलात एक मृतदेह जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. परंतु मृत इसमाचा चेहरा कुजलेला असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. हा गुन्हा गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुन्ह्याचा तातडीने तपास करण्यासाठी कोरची पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठित केले.
पोलिसांना घटनास्थळावर खोदकामाचे साहित्य आढळले. त्यावरुन आणि गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत मृत व्यक्ती हा जितू कंवर ( वय-३०, रा. जेठकन्हार, ता.डोंगरगड, जि.राजनांदगाव (छत्तीसगड)) येथील असल्याचे स्पष्ट केले.
कोरची तालुक्यातील खुर्शिपार येथील सोनाली हिचे छत्तीसगड राज्यातील जेठकन्हार येथील जितू कंवर याच्याशी आठ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुलेही आहेत. ती खुर्शिपार येथे आली होती. अशातच कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील शानू पठाण हा कुरखेडा-कोरची मार्गावर काळी-पिवळी टॅक्सी चालवत असल्याने त्याचे सोनालीशी प्रेमसंबंध जुळले. परंतु जितू हा दोघांच्या प्रेमात अडसर ठरत होता. त्यामुळे शानूने जितूला कायमचे संपविण्याचा विडा उचलला.
जानेवारी महिन्यात जितू कंवर हा खुर्शिपार येथे आला असता शानू पठाण याने पुंकेश बोरकर, चंद्रशेखर गुज्जेवार, धनपाल मडावी या तीन सहकाऱ्यांच्या मदतीने जितूला बाहेर नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत खून केला. त्यानंतर पोलिसांनी ४ फेब्रुवारीला शानू पठाण, सोनाली कंवर यांच्यासह पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.