

Gadchiroli Jeweller arrested in sexual assault and blackmailing case
गडचिरोली : देसाईगंज शहरातील नामांकित सराफ व्यापारी आणि त्याच्या सहकाऱ्यास 23 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. सुनील पुंडलिक बोके (४८) व अक्षय कुंदनवार (३२) दोघेही. रा. देसाईगंज) अशी आरोपींची नावे आहेत.
देसाईगंज येथील गांधी वॉर्डातील रहिवासी सुनील पुंडलिक बोके याचे शहरात राधा ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. सुनील बोके याने एका 23 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. कधी आपल्या राहत्या बंगल्यात, तर कधी आलीशान कारमध्ये तिच्यावर बलात्कार करुन ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन’, अशी धमकी दिली.
मात्र या सराफा व्यापाऱ्याचे लग्न झाले असल्याचे लक्षात येताच आपली फसगत झाल्याचे तिला समजले. त्यामुळे पीडित युवतीने सुनीलशी बोलणं बंद करून त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला. मात्र, सुनीलने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार यास पीडित युवतीवर पाळत ठेवण्यास सांगितले. अक्षयने तिला गाठून सुनीलचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्ट मधून काढून त्याला भेटण्यास बजावले. परंतु त्रास सहन न झाल्याने तिने धाडस करून सुनील बोके आणि अक्षय कुंदनवार यांच्या विरोधात रविवारी देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रकरणाचे गांभीर लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी रवीन भोसले व पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर यांनी सुनील बोके व अक्षय कुंदनवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.