

Gadchiroli Maoist Bandh on Basavaraj killing Protest
गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराज याच्यासह २७ नक्षली ठार झाले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन पोलिसांनी घडविलेले हे हत्याकांड आहे, असा आरोप करीत माओवाद्यांचा केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता 'अभय' याने १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.
२१ मे रोजी छत्तीसगडच्या अबुझमाड जंगल परिसरातील गुंडेकोट भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवा राजू याच्यासह २७ नक्षली ठार झाले. यासंदर्भात माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता 'अभय' याने पत्रक जारी केले आहे.
२१ मे रोजी झालेल्या चकमकीत बसवराजसह २७ माओवादी ठार झाल्यानंतर देशाच्या प्रमुख नेत्यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे सांगितले. मात्र, यानिषेधार्थ १० जूनला देशभर बंद पाळावा, तसेच ११ जून ते ३ ऑगस्ट या कालावधीत मृत माओवाद्यांच्या स्मरणार्थ सभा आयोजित कराव्यात, असे आवाहन अभयने केले आहे.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात न्यायमूर्ती चंद्रकुमार यांच्या नेतृत्वात हैदराबाद येथे शांतता चर्चा समिती गठित करुन केंद्र व राज्य सरकारने शांतता चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्याला आम्ही प्रतिसाद देऊन युद्ध थांबविण्याचे आवाहन केले आणि दोन महिने प्रचंड संयम राखला. परंतु सुरक्षा दलांनी अभियान राबविणे सुरुच ठेवले. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत देशभरात ८५ माओवादी ठार झाले, असे सांगून प्रवक्ता अभय याने सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराज याच्या माओवादी चळवळीतील प्रवेशापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास पत्रकात नमूद केला आहे.
२००१ पासून २०२५ पर्यंत बसवराज याने माओवाद्यांच्या केंद्रीय समितीद्वारे पारित नीतीविषयक दस्तऐवजांच्या निर्मितीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या मृत्यूमुळे माओवाद्यांचे प्रचंड नुकसान झाले असले; तरी ते कायमस्वरुपी नुकसान नाही. १९७२ मध्ये चारु मुजुमदारचा मृत्यू झाला. त्यानंतर माओवाद्यांचे अनेक मोठे नेते चकमकीत वा अन्य कारणांनी मृत्यूमुखी पडले. परंतु माओवादी डगमगले नाहीत. एका योद्ध्याच्या मृत्यूनंतर हजारो योद्धे निर्माण होतील, असा विश्वासही प्रवक्ता अभय याने व्यक्त केला आहे.