

गडचिरोली : सोमवार २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु होत असून, दुर्गम भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षल्यांचा हा पहिलाच शहीद सप्ताह असल्याने, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात नक्षली चकमकीत वा अन्य कारणाने मृत्यूमुखी पडलेल्या नक्षल्यांची स्मारके उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. काही वेळा ते हिंसक कारवायाही करतात.
या सप्ताहासंदर्भात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीने एक पत्रक जारी केले असून, वर्षभरात देशात ३५७ नक्षल्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या मृत नक्षल्यांमध्ये बिहार व झारखंडमधील १४, तेलंगणा राज्यातील २३, दंडकारण्यातील २८१, आंध्रप्रदेश-ओडिशा विशेष विभागातील ९, महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड(एमएमसी) मधील ८, ओडिशातील २०, पश्चिम घाटातील १ आणि पंजाबमधील एका नक्षल्याचा समावेश आहे.
यापैकी चार नक्षल्यांचा आजार आणि योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला. एकाने अपघातात प्राण गमावला, ८० नक्षली चकमकीत मारले गेले, तर २६९ नक्षल्यांना घेराव करुन हल्ल्यात ठार करण्यात आले, त्यात नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवाराजू याच्यासह ४ केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश असल्याचे नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे. छत्तीसगड पोलिसांनी सुरु केलेल्या ऑपरेशन 'कगार' मध्ये माओवादी संघटनेची सर्वांत मोठी हानी झाली, असे नक्षल्यांनी कबुल केले आहे. ऑपरेशन 'कगार' सारख्या पोलिसांच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हालाही आमची रणनीती बदलावी लागेल. त्याअनुषंगाने शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नक्षल्यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. छत्तीसगडमध्ये २१ मे २०२५ रोजी नंबाला केशव राव उर्फ बसवाराजूला पोलिसांनी ठार केल्यानंतर यंदाचा हा पहिलाच शहीद सप्ताह आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
२८ जुलैपासून सुरु होणाऱ्या नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाणे आणि मदत केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांचे सी-६० पथक मागील तीन दिवसांपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत असून, आठवडाभर ते सुरु राहील. ड्रोनद्वारे नक्षल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत असून, हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आले आहेत. आठवडाभर पोलिस महासंचालकांच्या परवानगीने मंजूर झालेल्या वैद्यकीय रजेशिवाय कुठलीही रजा देण्यात येणार नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी 'पुढारी' ला सांगितले.