

ETS Survey on Gadchiroli Illegal Mining
गडचिरोली : वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी महसूल व वनविभागाच्या जमिनीतून लाखो ब्रास मुरुम अवैधरित्या उत्खनन केल्याची तक्रार झाल्यानंतर प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर आले आहे. आता उत्खनन करण्यात आलेल्या खाणींची ईटीएस मशिनद्वारे मोजणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मागील काही महिन्यांपासून वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी पोर्ला महसूल मंडळ व वनपरिक्षेत्रातील पोर्ला, वसा, वसा चक येथील दोन्ही विभागांच्या जमिनीतून १० पोकलँड व ३० हायवाच्या माध्यमातून दररोज दिवस-रात्र हजारो ब्रास गौण खनिजाचे (मुरुम) अवैध उत्खनन करण्यात आल्याची तक्रार खांबाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रेल्वे रुळांसाठी तयार करण्यात येत असलेल्या रॅम्पसाठी परवानगीपेक्षा अधिक पटीने आणि विना रॉयल्टीने महसूल विभागाच्या जमिनीतून दिवसरात्र मुरुम उत्खनन केले. महसूल विभागाच्या जमिनीबरोबरच वनविभागाच्या जमिनीतूनही नियम धाब्यावर बसवून उत्खनन करण्यात आले. रेल्वे रॅम्पच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते तयार करताना मोठमोठे वृक्ष कापण्यात आले आहेत. जंगलातील फेन्सींग तोडून आणि टीसीएमच्या नाल्या बुजवून नियमबाह्यरित्या रस्ते तयार करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले होते.
तक्रारीनंतर सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी गंभीर प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. सध्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, आता ईटीएस मशिनद्वारे उत्खनन झालेल्या खाणींची मोजणी करण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने रॉयल्टीच्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले की त्यापेक्षा अधिक केले, याविषयीची इत्थंभूत माहिती ईटीएस मोजणीद्वारे स्पष्ट होणार आहे. यासाठी खनिकर्म विभाग, महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.