

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, जारावंडी परिसरातील दिंडवी येथील सदाशिव दुग्गा(६८) हे शेतात बैल चारत असताना वाघाने त्यांना ठार केले. सोमवारी(ता.२) ही घटना घडली. अडीच महिन्यातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
सदाशिव दुग्गा हे सोमवारी आपल्या शेतावर बैल चारण्यासाठी गेले होते. एवढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाघाने दुग्गा यांचा मृतदेह सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दिसून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.
मागील अडीच महिन्यात जारावंडी परिसरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १७ ऑगस्टला दोलंदा येथील हरी वड्डे नामक शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला. त्यानंतर १९ ऑक्टोबरला इरपनपायली येथील बिलाशी बा या वृद्धेलाही वाघाने ठार केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जारावंडी आणि पेंढरी येथे चक्काजाम आंदोलन करुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात १५ दिवसांत वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सध्या धान पीक कापणीच्या स्थितीत असल्याने नागरिकांना शेतावर जावे लागते. मात्र, वाघामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले आहे.