

गडचिरोली: कधी काळी जखमी नक्षलवाद्यांवर उपचार करणाऱ्या नक्षल्यांच्या डॉक्टर टीमच्या महिलेने आत्मसमर्पण करुन नवजीवनाची सुरुवात केल्यानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला. सम्मी उर्फ बंडी सुरेश हिचामी असे या प्रसूत महिलेचे नाव आहे.
सुरेश तानू हिचामी उर्फ अर्जुन उर्फ सागर (३२) हा छत्तीसगडमधील राही दलमचा विभागीय समिती सदस्य होता. तो एटापल्ली तालुक्यातील झुरी येथील रहिवासी आहे. केंद्रीय समिती सदस्य मल्लाजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याचा अंगरक्षक असलेल्या सुरेशचा सम्मी उर्फ बंडी पांडू मट्टामी, रा.बेरेलटोला (छत्तीसगड) हिच्याशी दलममध्ये असतानाच विवाह झाला. पुढे सुरेशने पत्नी सम्मी हिच्यासह १ जानेवारी २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सम्मी ही दंडकारण्य झोनच्या डॉक्टर टीमची एसीएम होती. त्या दिवशी केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी तारक्का हिच्यासह १२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते.
आत्मसमर्पणानंतर सुरेश व सम्मी हे सामान्य जीवन जगू लागले. गडचिरोली पोलिसांनीही त्यांना त्यासाठी मदत केली. दोघांचा संसार फुलत गेला. आज सम्मी उर्फ बंडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. या दाम्पत्यास पोलिस विभागाने यापूर्वीच १६ लाख ३ हजार रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. शिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लाससन व अन्य सुविधांचाही लाभ दिला आहे. अर्जुन व सम्मी यांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आतापर्यंत ७८३ नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. त्यांच्या उत्थानासाठी पोलिस दलाच्या वतीने आरोग्य, स्यंयरोजगार प्रशिक्षण, रोजगार आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्यानं आत्मसमर्पित नक्षल्यांचं जीवन सुसह्य झालं आहे.