
गडचिरोली : वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या तसेच वनपट्ट्याच्या जमिनीतून अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा दाखल करुन दोषी वनकर्मचाऱ्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी वनविभागाशी संबंधित इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आजपासून गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन आरंभिले आहे.
वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे कंत्राट जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे. मागील काही महिन्यांपासून ही कंपनी लोहमार्गासाठी रॅम्प तयार करण्याचे काम करीत आहे. मात्र, आरमोरी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या आणि वनपट्ट्याच्या जमिनीवरुन संबंधित कंपनीद्वारे रात्रीच्या वेळी अवैध मुरुम उत्खनन करुन त्याची वाहतूक करीत आहे.
अशी वाहतूक करताना जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ३३ हायवा आणि ३ पोकलेन वनपरिक्षेत्राधिकारी बडोले व वनरक्षक पाटील यांनी कृष्णा वाघाडे यांच्यासमक्ष पकडले. परंतु दोघांनीही वाहने जप्त न करता सकाळी ती जप्त करण्यात येतील, असे दोन्ही कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, आजतागायत ही वाहने जप्त करण्यात आली नाहीत. त्यामुळे जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा दाखल करावा, तसेच या कंपनीची वाहने सोडून देणाऱे वनपरिक्षेत्राधिकारी बडोले व वनरक्षक पाटील यांना निलंबित करावे, या मागणीसाठी कृष्णा वाघाडे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
तसेच पोर्ला वनपरिक्षेत्रातील पोर्ला गावातील कुंभारबोडीच्या सर्वे क्रमांक 221 मधील वन जमिनीतून मुरूम उत्खनन करून वनक्षेत्रातील तारांचे कुंपण तोडून मुरुम वाहतूक करण्यात आली आहे. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर व क्षेत्र सहायक अरुण गेडाम यांनी आर्थिक हेतूसाठी संबंधित कंपनीवर कुठलीही कारवाई केली नाही.
त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर व क्षेत्र सहायक अरुण गेडाम यांनाही तत्काळ निलंबित करावे, शिवाय मार्कंडा(कं) व पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांची सागवान वृक्षतोड करण्यात आली आहे. यासाठी त्या परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहायक व वनरक्षकास जबाबदार धरुन त्यांनाही तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या ठिय्या आंदोलनात कृष्णा वाघाडे यांच्यासह शंकर ढोलगे, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर व प्रवीण ठाकरे हेही सहभागी झाले आहेत.