

गडचिरोली, ता. 12 : गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाने प्रगतशिल शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्यासाठी काही श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींची निवड केल्याचा आरोप होत असून, या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या असंघटीत कर्मचारी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी या निवडीवर आक्षेप घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रगतशिल शेतकऱ्यांना विदेशातील शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, जलसंधारण प्रणाली, सेंद्रीय शेती, हरितगृह पद्धती आणि कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा दौऱ्याचा उद्देश आहे. हा दौरा युरोप, इस्रायल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे.
मात्र, या दौऱ्यासाठी निवडलेल्या पाच व्यक्तींपैकी काहीजण श्रीमंत आणि प्रभावशाली असून, ते प्रत्यक्षात शेतीशी संबंधित नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवड प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
या निवड प्रक्रियेसाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर अर्ज मागवले होते. अर्जदारांची पडताळणी करून ज्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, उत्पादनवाढ साधली आणि सेंद्रिय शेतीत योगदान दिले अशा शेतकऱ्यांची निवड व्हायला हवी होती, असा पेंदोरकर यांचा आग्रह आहे.
मात्र, निवड झालेल्या काही व्यक्तींकडे ना प्रगतशिल शेतीचा अनुभव आहे, ना कोणत्याही कृषी मेळाव्यात त्यांचा सहभाग राहिला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “ही निवड पूर्णपणे अन्यायकारक असून शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे,” असे पेंदोरकर यांनी निवेदनात नमूद केले.
कुणाल पेंदोरकर यांनी निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत संपूर्ण चौकशी करावी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे. यासोबतच भविष्यात अशा शासकीय योजनांमध्ये खऱ्या अर्थाने प्रगतशिल आणि मेहनती शेतकऱ्यांना संधी देण्याची मागणी त्यांनी केली.
या प्रकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागावर टीकेची झोड उठली आहे. स्थानिक शेतकऱ्यांमध्येही या निर्णयाविरोधात असंतोषाचे वातावरण दिसत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.