

विजय लाळे
विटा : ‘आगीमुळे फ्रिजचे कॉम्प्रेसर टप्प्या-टप्प्याने बॉम्ब फुटतात तसे फुटत असावेत... फटाके जोरदार फुटावेत, तसे आवाज सकाळी येत होते... दुकानात चार-पाच फ्रिज विक्रीसाठी होते...’ येथील जळीतकांडाबाबत प्रत्यक्षदर्शी सांगत होते. एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या जळीतकांडाविषयी समाजमन हळहळत आहे.
येथील सावरकर नगरातील जुन्या वासुंबे रस्त्यालगत जय हनुमान स्टील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानात लागलेली आग सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात आली. मालक विष्णू जोशी, त्यांची पत्नी सुनंदा जोशी, मुलगी प्रियांका आणि नात सृष्टी इंगळे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर मनीष आणि सूरज ही दोन मुले जखमी झाली.
आगीतून वाचलेला सूरज जोशी या दुकानाच्या शेजारीच असलेल्या चुलत भावाच्या दुकानात बसला होता. रडून त्याचे डोळे सुजले होते. तो म्हणाला, वडील आणि मी रात्री दोन वाजता घरी आलो. भाऊ मनीषचं लग्न ठरलेलं आणि माझंही पुढच्याच महिन्यात ठरलेलं. गेल्याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये आम्हा दोघांचाही साखरपुडा मोठा झाला होता. मनीषचे लग्नही मोठे करायचे ठरले होते. रविवारी रात्री उशिरा घरात सगळेच आमची वाट पाहत होते. रात्री दोनला घरी आल्यानंतर तिथून पुढे पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही लग्नाविषयी गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर आम्ही झोपलो. सकाळी सव्वाआठ वाजता मनीष उठला आणि खाली दुकानात जाऊन आला. बिल्डींगमध्ये सगळ्यात खाली दुकान, मधल्या माळ्यावर फर्निचर व इतर साहित्य आणि तिसऱ्या माळ्यावर आम्ही झोपलो होतो. पावणेनऊच्या दरम्यान मला फोन आला की, दुकानातून धूर येतोय, काही पेटवले आहे काय? मी पटकन उठलो आणि खाली जायला निघालो, तर धुराचा लोट एकदम वर येत होता.
आई, वडील वगैरे झोपलेल्या ठिकाणी जायला लागलो, तर लिफ्ट उभारण्यासाठी ठेवलेल्या मोकळ्या डक्टमधून आगीचे लोट आणि प्रचंड धूर वर येत होता. थोड्याच वेळात संपूर्ण माळा काळोखात बुडाला. पुढचे काहीही दिसेना. तोपर्यंत भाऊ मनीष टेरेसवर गेला. मी या सगळ्यांना घेऊन अंदाजानेच गॅलरीकडे जाऊ लागलो. परंतु गॅलरी नेमकी कोणत्या दिशेने आहे, हेच समजत नव्हते. शेवटी जिथून धूर बाहेर जात होता, तिथे थोडा प्रकाश आणि आकाश दिसल्यावर तिकडे गेलो. आम्ही खालील लोकांना आरडाओरडा करून मदतीसाठी हाका मारत होतो, इतक्यात पुन्हा धूर आणि आग पुढूनही वरपर्यंत आली. आम्ही परत खोलीत गेलो. तोवर माझ्या छातीवर कोणी तरी बसले आहे, श्वास कोंडतो आहे, असे जाणवले, मी पडलो आणि...! खाली दुकानाचे शटर बंद असल्याने सगळी आग आणि धूर वरच्या मजल्यापर्यंत पोहोचला.
दुकानात दहा वर्षांपासून कामगार म्हणून काम करत असलेले आणि जय हनुमान इमारतीच्या मागच्याच बाजूला कॉलनीत घर असलेले नितीन माने म्हणाले, आग लागल्याचे नऊ वाजण्याच्यादरम्यान मला समजले. दुकानाच्या पुढच्या भागात गेलो, तर तिथे शटर तोडायचे काम चालले होते. मी तिथल्या लोकांना शटर उघडायचा हँडल दिला. त्यानंतर कसे तरी अर्धे शटर वर उचलले. तोपर्यंत प्रचंड धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले.
आगीतून बचावलेली विष्णू जोशी यांची दोन मुले, थोरला मनीष आणि धाकटा सूरज यांना उपचारानंतर रुग्णालयातून मंगळवारी घरी सोडण्यात आले. विष्णू जोशी यांची मुलगी प्रियांका यांचे पती योगेश इंगळे यांचाही चेहरा अतीव दुःखाने विमनस्क झालेला. घटनेची माहिती मिळताच लगेचच सायंकाळी ते गोव्यातील मडगावातून विट्यात दाखल झाले होते. पत्नी, चिमुकली लेक सृष्टी, सासरे विष्णू आणि सासू सुनंदा यांच्या मृत्यूने तेही हादरून गेले होते.