

कापेवंचा येथील एका निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्या नक्षलवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद मधुकर कोडापे (वय.३७, रा.भंगारामपेठा ,ता.अहेरी) असे अटकेत असणाऱ्या नक्षल्याचे नाव आहे. दामरंचा उपपोलिस ठाणे आणि केंद्रीय राखीव दलाच्या बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना प्रमोद कोडापे यास संशयितरित्या फिरताना अटक करण्यात आली.
यावेळी चौकशीअंती तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय २४ नोव्हेंबर २०२३ रोजी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम नामक व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग होता. २०१७ पासून नक्षल्यांच्या जनमिलिशियाचा तो सदस्य म्हणून कार्यरत होता. राज्य शासनाने त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, असे पोलिसांनी सांगितले. २०२२ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी ८९ नक्षल्यांना अटक केली आहे.