Gadchiroli Accident | अन् धावत्या एसटी बसचा मागचा पत्रा अचानक पडला निखळून....! सुदैवाने दुर्घटना टळली

एटापल्ली येथील धक्कादायक घटना, एसटी बसेसची अवस्था चिंताजनक, प्रवाशांचा जीव टांगणीला
Gadchiroli Accident | अन् धावत्या एसटी बसचा मागचा पत्रा अचानक पडला निखळून....! सुदैवाने दुर्घटना टळली
Gadchiroli Accident | अन् धावत्या एसटी बसचा मागचा पत्रा अचानक पडला निखळून....! सुदैवाने दुर्घटना टळली
Published on
Updated on

गडचिरोली : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा अजब नमुना एटापल्ली येथे बघावयास मिळाला. धावत्या बसचा मागील भाग अचानक निखळून पडला. मात्र, मागे कुणीच नसल्याने जीवित हानी टळली.

सोमवारी(ता.६) संध्याकाळी मानव विकास मिशनची अहेरी आगाराची बस गडचिरोली येथून मुलचेरा, बोलेपल्ली मार्गे एटापल्ली शहरात पोहचली. ही बस संथगतीने बसस्थानकाकडे जात असताना गोटूलसमोरच्या मुख्य रस्त्यावर अचानक बसचा मागील भाग निखळून खाली पडला. मोठा आवाज झाल्याने चालकाने तत्काळ बस थांबवली. बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. आवाज ऐकून तेही खाली उतरले. सर्वांना बसचा मागील भाग निखळून पडल्याचे दिसून आले.

या बसच्या मागे कुणी नागरिक वा वाहन नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बसमधील प्रवासीही बालंबाल बचावले. या घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी करुन बसचालक आणि वाहकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. बसचा मागील पत्रा जीर्ण झाल्याचे आणि तो कसाबसा चिकटवल्याचे दिसून आले. ही बस शहराबाहेरच्या राष्ट्रीय महामार्गावरुन जादा वेगाने असती आणि एखादा दुचाकीस्वार मागे असता तर मोठा अनर्थ ओढवला असता. परंतु शहरात कमी वेगाने धावत असल्याने विपरीत घडले नाही.

सहायक कारागीर निलंबित

या घटनेनंतर परिवहन महामंडळाच्या गडचिरोली येथील विभागीय नियंत्रकांनी चौकशीचे आदेश दिले. बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अहेरी बस आगारातील सहायक कारागिराला निलंबित करण्यात आले आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत वाभाडे काढणाऱ्या घटना

यापूर्वीही परिवहन महामंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. ९ जुलै २०२४ रोजी गडचिरोली-घोट बसच्या छतामधून जलधारा बरसल्याने प्रवाशांना ओलेचिंब व्हावे लागले होते. त्याआधी २६ जुलै २०२३ रोजी अहेरी आगाराच्या धावत्या बसचे छत हवेत उडाले होते. त्याचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

logo
Pudhari News
pudhari.news