

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपद स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यविषयक हेळसांड सहन करावी लागत आहे. एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथील जखमी झालेल्या इसमास दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यास खाटेची कावड करुन तीन किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागल्याचा विदारक प्रकार उघडकीस आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही चांगल्या रस्त्यांचा अभाव आहे. कुठे नाल्यावर पूल नसल्याने दोराच्या साह्याने नागरिकांना पुरातून वाट काढावी लागते, तर कुठे रस्ताच नसल्याने जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर ही स्थिती अधिकच बिकट असते. एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही या गावाला जाण्यासाठीही पक्का रस्ता नाही. तेथील मनिराम रामा हिचामी(३५) हा त्याच्या शेतात ट्रॅक्टरने चिखल करीत असताना ट्रॅक्टर उलटला. यामुळे मनिरामच्या कंबरेला जबर दुखापत झाली. सोबतच्या नागरिकांनी जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतू तेथील रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन गडचिरोलीला गेली होती. त्यामुळे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी खाटेची कावड बनवून मनिरामला कसूरवाही गावापर्यंत जंगलातून तीन किलोमीटरची पायपीट करीत आणले. त्यानंतर जारावंडीच्या डॉक्टरांनी परिचारिकेचे खासगी वाहन पाठवून त्यातून मनिरामला जारावंडीत आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार करुन त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेची रुग्णवाहिका चिखलात फसली
दुसरे प्रकरण कुरखेडा तालुक्यात घडले. प्रियंका विनोद मडावी(२५) ही विवाहिता कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा या आपल्या माहेरी प्रसूतीसाठी आली होती. १ ऑगस्टला तिला प्रसववेदना जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेद्वारे प्रियंका मडावी,तिचे कुटुंबीय आणि आशा वर्कर कांचन शिंदे हे कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे जाण्यास निघाले. मात्र, जांभुळखेडा ते गोठणगाव नाक्यादरम्यान रुग्णवाहिका रस्त्यावरील चिखलात फसली. ही वार्ता कळताच जांभुळखेड्याचे सरपंच गणपत बन्सोड यांनी ट्रॅक्टर बोलावून केजव्हीलच्या साह्याने चिखल बाजूला केला. यामुळे रुग्णवाहिका बाहेर निघण्यास मदत झाली. प्रियंकाला उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला तिने बाळाला जन्म दिला.
आमदार रामदास मसराम आक्रमक
दरम्यान, प्रियंका मडावीला त्रास झाल्याचे कळताच आ.रामदास मसराम यांनी गोठणगाव नाका गाठून राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्याची खरडपट्टी काढली. बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकास बोलावून चिखलातून चालायला लावले.
तीन महिन्यांपासून महामार्गाचे काम अपूर्ण
सध्या ब्रम्हपुरी-देवरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. परंतु कुरखेडानजीकच्या गोठणगाव नाका ते जांभुळखेडा हा दोन किलोमीटरचा महामार्ग उन्हाळ्यात एकाचवेळी दोन्ही बाजूंनी खोदण्यात आला. त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.
विजय वडेट्टीवार यांची 'एक्स'वरुन टीका
दरम्यान खाटेची कावड करुन रुग्णाला दवाखान्यात नेत असल्याचा व्हीडिओ विधान सभेतील काँग्रेसचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स'वर पोस्ट केला आहे. खऱ्या महाराष्ट्राचं चित्र झाकून टाकायचं आणि हे फसवे आकडे, योजना, परदेश दौरे, गुंतवणूक परिषदा हा सगहा दिखावा करायचा, कशासाठी? असा प्रश्न आ.वडेट्टीवार यांनी विचारला आहे. हा केवळ व्हिडिओ नाही तर निष्क्रिय महायुती सरकारच्या कारभाराचा आरसा आहे. जिथं आजही पायाला चप्पल नाही, आजारी माणूस झोळीतून रुग्णालयात जातोय आणि हे मंत्रीसाहेब मात्र हवेत उड्डाण करतायंत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.