

गडचिरोली : विविध दलममध्ये कार्यरत ११ जहाल नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात १ विभागीय समिती सदस्य, एक क्षेत्र समिती सचिव, एक प्लाटून पार्टी सदस्य, १ कमांडर, १ क्षेत्र समिती सदस्य आणि अन्य ६ दलम सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर एकूण ६८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं.
सोनी उर्फ बाली वत्ते मट्टामी, बुदरी उर्फ रामबत्ती आयतू मट्टामी, सुखलाल बोळगा कोक्सा, शांती उर्फ सोमरी गंगा तेलामी, यमुनक्का उर्फ रुखमाक्का पेंदाम, गणेश कोवासी, मिनको उर्फ जमनी काऱ्या मट्टामी, धनू दसरु वेळंजे, सुनीता उर्फ वंगे वत्ते होयाम, रमेश पांडू मडावी आणि किशोर सुक्रय्या वासम यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. नक्षल आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आजतागायत ७४९, तर २०२५ पासून १२३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
याप्रसंगी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी, अभियानप्रमुख विशाल नागरगोजे उपस्थित होते.
सोनी मट्टामी(४५) ही छत्तीसगडमधील रहिवासी असून, तेथील कुतुल दलमची विभागीय समिती सदस्य होती. सन २००० पासून ती नक्षल चळवळीत कार्यरत होती. बुदरी मट्टामी(४०) ही देखील छत्तीसगडची रहिवासी असून, २००२ पासून तेथील विविध दलममध्ये कार्य केल्यानंतर सध्या इंद्रावती एरिया कमिटीची सचिव म्हणून कार्यरत होती. छत्तीसगडचा रहिवासी असलेला सुखलाल कोक्सा(३१) हा २०१३ मध्ये नक्षल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील तांत्रिक समितीत भरती झाला. २०२४ पासून तो पश्चिम ब्युरो सप्लाय टीमचा कमांडर होता. शांती तेलामी सप्लाय टीमची सदस्य होती. यमुनक्का पेंदाम ही भामरागड दलमची एरिया कमिटी सदस्य होती. गणेश कोवासी, मिनको मट्टामी व धनू वेळंजे हे कंपनी क्रमांक १० चे सदस्य होते. सुनीता होयाम ही सैंड्रा दलमची सदस्य, रमेश मडावी हा मोबाईल पोलिटीकल स्कूलचा सदस्य तर किशोर वासम हा सैंड्रा दलमचा मिलिशिया कमांडर होता.
आता केवळ ६ नक्षली शिल्लक: पोलिस अधीक्षक
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले केवळ ६ नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत. ते कंपनी क्रमांक १० चे सदस्य असून, एक जण गडचिरोली जिल्हृयातील तर अन्य पाच छत्तीसगडचे आहेत, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. ३१ मार्च पूर्वी जिल्हा नक्षलमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.