Gadchiroli Naxal : ५० आत्मसमर्पित माओवाद्यांना निरोप, मूळ जिल्ह्यात रवानगी!

आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आतापर्यंत ८१९ माओवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Gadchiroli Naxal : ५० आत्मसमर्पित माओवाद्यांना निरोप, मूळ जिल्ह्यात रवानगी!
Published on
Updated on

गडचिरोली : हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या ५० माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितरित्या रवाना करण्यात आले. यानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज त्यांना पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या उपस्थितीत आयोजित एका समारंभात निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील माओवादीविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, पोलीस दलाच्या अभिलेखावर आता एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी अभियानासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे अनेक जहाल माओवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. २००५ पासून राबविण्यात येत असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Gadchiroli Naxal : ५० आत्मसमर्पित माओवाद्यांना निरोप, मूळ जिल्ह्यात रवानगी!
Gadchiroli News: स्ट्रेचरवरून दोन नाले पार करत रुग्णालयात पोहोचलेल्या गर्भवतीने दिला जुळ्या मुलींना जन्म

आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक साहाय्य, शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्यविकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. पोलिसांच्या 'प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून पुनर्वसनाला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. आरोग्य तपासणी, नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, ध्यान व योग शिबिरांच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून देण्यात आले असून, ८८ आत्मसमर्पित माओवाद्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून कौशल्यविकास प्रशिक्षण व रोजगार देण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांनी कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन केले. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक(कार्तिक मधिरा), सहायक पोलिस अधीक्षक सुयशकुमार सिंग, सागर भामरे, पोलिस उपअधीक्षक सुनील उईके, आत्मसमर्पण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news