

Youth Murder Gadchiroli
गडचिरोली : पैशाच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.१६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. सचिन कोल्हूरवार(३५) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपी महेश बुरांडे फरार झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन कोल्हूरवार हा विवेकानंदनगर येथील रहिवासी असून, संविधान चौकात तो जनरल स्टोअर चालवत होता. आरोपी महेश बुरांडे हा लाझेडा येथील रहिवासी असून, त्याचे फर्निचर बनविण्याचे दुकान होते. २०१९ मध्ये सचिनने महेश बुरांडे यास त्याच्या जनरल स्टोअरसाठी फर्निचर बनविण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये दिले होते.
परंतु, महेशने फर्निचर बनवून दिले नाही, शिवाय सचिनला पैसेही परत केले नाही. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. आज महेश बुरांडे याने सचिन कोल्हूरवार यास लांझेडा येथे आपल्या फर्निचर बनविण्याच्या ठिकाणी बोलावले. तेथे सचिन हा त्याचा मित्र दीपक नंदेश्वर याच्यासमवेत गेला.
यावेळी महेश व सचिन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यातच महेश बुरांडे यांनी घरुन मिरची पावडर आणून सचिन आणि त्याचा मित्र दीपक नंदेश्वर यांच्या अंगावर फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोघेही घाबरलेल्या अवस्थेत असताना महेशने फर्निचर बनविण्याच्या धारदार शस्त्राने सचिनवर जबर वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी महेश बुरांडे याने पैशाच्या देवाणघेवाणीतून सुनियोजितरित्या सचिनची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे. आरोपी महेश बुरांडे हा फरार असून, त्याच्या शोधार्थ विशेष पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.