

Mulchera taluka Pulligudam Mahavitaran engineer drowning incident
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली येथील मूळ रहिवासी व नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे महावितरण कंपनीत सहायक अभियंता पदावर कार्यरत दलसू कटिया नरोटे (वय ३७) यांचा कारमपल्ली गावाजवळच्या नाल्यात बुडून मृत्यू झाला.
दलसू नरोटे हे सुट्या घेऊन जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधनासाठी पत्नी व दोन मुलांना घेऊन ७ ऑगस्टला मुलचेरा तालुक्यातील पुल्लीगुडम या आपल्या सासुरवाडीला गेले. दुसऱ्या दिवशी ते कारमपल्लीला गेले. तेथे शेतात धान रोवणी सुरु असल्याने ते शेतावर गेले. काही वेळाने ते जवळच्या नाल्यावर गेले. मात्र, मिरगी आल्याने ते नाल्यात पडले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नाल्याकडे जाऊन बघितले असता ते पाण्यात पडलेले दिसले. त्यांना एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दलसू नरोटे हे आदिवासीबहुल कारमपल्ली गावातील पहिलेच वीज अभियंता होते. २०१४ मध्ये ते महावितरणमध्ये रुजू झाले. गडचिरोली, कोल्हापूर, परभणी येथे कार्य केल्यानंतर सध्या ते नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे कार्यरत होते. मात्र, गावाकडे येताच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.