

गडचिरोली : नियोजन भवन येथे आज (दि.४) आयोजित कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी २१० उमेदवारांना समुपदेशन व पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्ती देण्यात आली. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले ८०, तर अनुकंपा तत्त्वावर १३० उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी ५९ महिला आहेत.
शासनाने दिलेल्या संधीचा उपयोग जनतेला सुलभ व जलद सेवा देण्यासाठी करा, असे आवाहन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी केले. शासकीय सेवक म्हणून काम करताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या कार्यातून सामान्य नागरिकांच्या मनात शासनाविषयी सकारात्मक भावना, विश्वास आणि आनंद निर्माण व्हावा, अशा सेवा भावनेतून काम करावे, असेही जयस्वाल म्हणाले.
कार्यक्रमाला आ.डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.