गडचिरोली: कोरची तालुक्यात हिवतापाचा उद्रेक सुरुच; आणखी एका बालिकेचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बालिकेचा मलेरियाने मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बालिकेचा मलेरियाने मृत्यू

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : कोरची तालुक्यातील कोटगूल परिसरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला हिवतापाचा उद्रेक अद्यापही थांबताना दिसत नाही. आलोंडी येथील एका नऊ वर्षीय बालिकेचा हिवतापाने मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरती करणसाय कुंजाम असे मृत बालिकेचे नाव आहे.

आरतीला ताप येत असल्याने तिला ३१ मेरोजी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तपासणीअंती चाचणी मलेरिया पॉझिटीव्ह आली. डॉ. रंगारी आणि डॉ.नाकाडे यांनी तिच्यावर उपचार केले. परंतु लगेच आरतीला झटके येऊ लागल्याने तिला कोरचीला रेफर करण्यात आले. परंतु कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांना बरेचदा गडचिरोलीला रेफर करण्यात येते, ही बाब माहिती असल्याने पालक तिला वासळी येथील खासगी डॉक्टरकडे घेऊन गेले. परंतु प्रकृतीत सुधारणा न होता ३ जूनला आरतीचा मृत्यू झाला.

कोटगूल परिसरात हिवतापाच्या आजाराने अनेक नागरिक फणफणत असून, मागील दोन महिन्यांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोटगूलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील गोडरी येथील एकाच कुटुंबातील करिश्मा नैताम (वय ६) व प्रमोद नैताम (वय ४) या दोन चिमुकल्या भावंडांचा हिवतापाने मृत्यू झाला. त्यानंतर लेकुरबोडी येथील रामबाई गावडे ही महिला १७ एप्रिलला दगावली होती. आता जूनच्या प्रारंभी बालिकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

आरोग्य यंत्रणाच सलाईनवर

कोरची तालुक्यात आरोग्य यंत्रणाच सलाईनवर आहे. कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदाचा प्रभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्याकडे आहे. परंतु ते कोटगूलला महिन्यातून क्वचितच भेट देत असल्याचे नागरिक सांगतात. गोडरी येथील दोन भावंडांचा हिवतापाने मृत्यू झाल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांनी कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन यापुढे हिवतापाने कोणाचाही मृत्यू होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सक्त ताकीद दिली होती. परंतु अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि मृत्यूसत्र थांबलेले नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news