

Porla Forest Range Leopard Death
गडचिरोली : वाघाशी झालेल्या झुंजीत जखमी झाल्यानंतर तीन जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत चांभार्डा गावानजीक आज सकाळी ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत चांभार्डा-मरेगाव पांदण रस्त्यालगत हरिदास मुनघाटे यांच्या शेताजवळ एक बिबट जखमी अवस्थेत निपचित पडलेला आढळून आला. त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या विलास दादाजी ठाकरे (वय ४८), रेखा खुशाल मडावी (वय ४५) आणि लुभाजी देवराव मुनघाटे (वय ४०) (सर्व रा.चांभार्डा) यांनी बिबट मृत असल्याचे समजून त्याच्या जवळ जाऊन पाहिले. मात्र, बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. यामुळे तिघेही जखमी झाले.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.पाचभाई आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी नागरिकांवर सुरुवातीला चांभार्डा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
बिबट्याची प्रकृती तपासण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या चमूला पाचारण करण्यात आले. मात्र, बिबट्याची कोणतीही हालचाल न दिसल्याने तो मृत झाल्याचे निष्पन्न झाले.
वाघाशी झालेल्या झुंजीमुळे मृत्यू
वनविभागाने बिबट्याच्या मृतदेहाचे सुक्ष्म निरीक्षण केले असता, त्याचे शरीर आणि मानेवर दुसऱ्या प्राण्याचे दात व नखे रुतल्याच्या खोल जखमा दिसून आल्या. प्राथमिक अंदाजानुसार, बिबट्याची दुसऱ्या एखाद्या वाघासोबत झुंज झाली असावी आणि त्यात लागलेल्या गंभीर जखमांमुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सहायक वनसंरक्षक आर.एस.सुर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. पाचभाई (पोर्ला), आरमोरीचे पोलीस निरीक्षक के. व्ही. गवते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मृणाल टोंगे आणि शीघ्र कृती दलाचे कर्मचारी उपस्थित होते.