

Gadchiroli Flood Rescue
गडचिरोली : जिल्ह्यात बुधवारी (दि.२३) रात्री मुसळधार पाऊस पडल्याने नदी, नाले तुडुंब वाहत असून, तीन अंतर्गत मार्गांवरील वाहतूक ठप्प् झाली आहे. दरम्यान, मुलचेरा तालुक्यातील कोलपल्लीनजीकच्या नाल्याच्या पुरात अडकलेल्या ग्रामसेवकाची आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुटका केली, तर अहेरीनजीकच्या आलापल्ली येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
काल रात्री जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक २४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात १२७.१ मिलिमीटर पाऊस पडला.
कढोलीनजीकच्या सती नदीला पूर आल्याने कुरखेडा-वैरागड मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. नाल्याच्या पुरामुळे तळेगाव-पलसगड मार्ग बंद आहे, तसेच गडचिरोली तालुक्यातील कुंभी-माडेमूल या मार्गावरील वाहतूकही प्रभावीत झाली आहे.
काल संध्याकाळी मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे(४५) हे चारचाकी वाहनाने कोलपल्लीनजीकचा नाला ओलांडत असताना अचानक प्रवाह वाढला. यामुळे वाहन वाहून जायला लागले. धोडरे यांनी वाहनातून बाहेर पडून झाडाला घट्ट पकडून ठेवले. काही वेळाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.
अतिवृष्टीमुळे आलापल्लीच्या सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने १७ कुटुंबांतील ६४ जणांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज व तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.