

Bus Conductor Assault
गडचिरोली : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस थांबली असता एका दुचाकीस्वाराने बससमोर दुचाकी आडवी लावून बस वाहकावर जीवघेणा हल्ला केला. यात वाहक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी (ता.१८) दुपारी मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर गावाजवळ घडली. सुहास हंबर्डे असे जखमी वाहकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलचेरा पोलिसांनी आरोपी व्यंकटेश गजलवार (रा. कोपरअली) यास अटक केली आहे.
गडचिरोली येथून मुलचेरामार्गे अहेरीकडे जाणारी बस काल दुपारी साडेबारा वाजता गडचिरोलीवरुन सुटली. या बसवर सेवाभावी दराडे हे चालक, तर सुहास हंबर्डे हे वाहक होते. ही बस मुलचेरावरुन जात असताना सुंदरनगरजवळ खड्डे असल्याने चालकाने बस थांबवली. एवढ्यात व्यंकटेश गजलवार हा मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकलवरून आला. त्याने मोटारसायकल बससमोर आडवी लावली. वाहक सुहास हंबर्डे यांनी मोटारसायकल बाजूला करण्याची विनंती केली असता व्यंकटेश गजलवार याने शिवीगाळ करत हंबर्डे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले.
मुलचेरा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यंकटेश गजलवार यास अटक केली. वाहक हंबर्डे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ऋतुजा खापे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, त्यांनी बससेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.