गडचिरोली : रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, ८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे.
मागील २४ तासांत देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात ११६.६ मिलिमीटर पाऊस पडला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली अहेरी-मोयाबीनपेठा, कुरखेडा-चारभट्टी, आलापल्ली-सिरोंचा, जारावंडी ते पाखांजूर, पोर्ला-वडधा, वैरागड-शंकरपूर या आठ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ पैकी २७ दरवाजे उघडण्यात आले असून, तेथून ३ हजार ३३ क्युमेक्स, तर तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा बॅरेजमधून १० हजार ५७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणातून ५ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याने नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट दिला असून, काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सिक्चे संकेत दिले आहेत.