

गडचिरोली : अल्पवयीन मतीमंद मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना बुधवारी(ता.१) कोरची येथे घडली. याप्रकरणी कोरची पोलिसांनी बंडू सहारे(५५) रा.हेटळकसा, ता.कोरची यास अटक केली आहे.
बुधवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास बंडू सहारे याने अल्पवयीन मतीमंद मुलीला फूस लावून सायकलवर बसवून नेले. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या एका घरात नेले. ही बाब एका चहाटपरी चालविणाऱ्या महिलेने बघितली. तिने ही बाब फिर्यादीस सांगितली. त्याने रस्त्याने येत असलेल्या दोन परिचित आशा वर्कर्सना सांगितल्यानंतर तिघेही बांधकाम सुरु असलेल्या घरात गेले. तेथे आरोपी बंडू सहारे हा त्या मतीमंद मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला. तिघांनीही पीडित मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मात्र, आरोपी बंडू सहारे सायकलने पळून जात होता. फिर्यादी आणि आशा वर्कर्सनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यास पकडून ठेवले.
घटनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बंडू सहारे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(आय)(के), ६५, सहकलम ४(२),६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी व उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र्र भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.