

Gadchiroli Congress Bhajan Andolan
गडचिरोली : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेसने आज गडचिरोली येथील फुटका देऊळ परिसरातील हनुमान व श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम हे भजन गाऊन आंदोलन केले.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे यांनी राम मंदिरातील देणगीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आरोपी हे भाजप समर्थक असून त्यांनी लोकांच्या श्रद्धेवर प्रहार केला आहे. आतापर्यंत इमारत, रस्ता व पुलाच्या कामात भ्रष्टाचार होत होता. त्यानंतर आमदार आणि खासदारांचीही चोरी करून झाली. आता हे लोक मंदिरातील दानपेटीतील रक्कम आणि दागिन्यांची चोरी करत आहेत, असा आरोप विश्वजित कोवासे यांनी केला.
भाजपा देव आणि धर्माच्या नावावर मते मागून सत्तेत येतो, परंतु नंतर लोकांच्या श्रद्धेवरच प्रहार करतो. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोवासे यांनी केली. या आंदोलनानंतर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. राम मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नंदू वाईलकर, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, रमेश चौधरी, मीनल चिमूरकर, जितेंद्र मुनघाटे, प्रभाकर वासेकर, मनोज ढोरे, विजय लाड, विनोद लेनगुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.