

Gadchiroli Collector Avishant Panda
गडचिरोली : शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही तालुक्यातील विकास कामे रखडली, तर सहन केले जाणार नाही. वारंवार बैठका घेऊन, सूचना देऊनही स्थानिक अधिकारी ऐकत नसतील तर अशा अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल,असा इशारा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आज कोरची येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिला.
कोरची येथे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून विभागनिहाय प्रगती अहवाल मागितला. कर्मचारी वसाहतीचे अर्धवट राहिलेले काम, रबी हंगामात कृषी क्षेत्र वाढविणे, विधवा व परितक्त्या महिलांना आर्थिक लाभ देणे, धान्य खरेदी केंद्र सुरू करणे, सोहले येथील लोहखाणीतील कच्चामाल चोरी प्रकरण अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावत जाब विचारला.
मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी चांगलेच संतापले. शासन मोठ्या प्रमाणात निधी पाठवतो, तरीही तालुक्याचा विकास होत नाही. अशा निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन, असा इशारा जिल्हाधिकारी पंडा यांनी दिला. बैठकीत उपस्थित अधिकारी व कर्मचारी या इशाराने चांगलेच हादरले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी कोरचीतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. मात्र शाळेच्या इमारतीला खेटून सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने वर्ग खोल्यांमध्ये घाणेरडा वास येत असल्याचे लक्षात आले. यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तत्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. यावेळी कोरची नगरपंचायतीत चाललेली बांधकामाची अनियमितता, भ्रष्टाचार आणि विविध समस्यांचे निवेदन गावकऱ्यांनी दिले. त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पंडा यांनी दिले. याचवेळी त्यांनी महिला मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या माती रोटी हॉटेलला भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिवाय मोहफुलांपासून विविध पदार्थ तयार करणाऱ्या संस्थांच्या कामाची पाहणी करून स्थानिक उद्योगाला चालना देणाऱ्या दृष्टीने मार्गदर्शन केले.