

गडचिरोली : टीव्हीवरील चॅनल पाहण्याचा चिमुकल्यांचा हट्ट किती जिवघेणा ठरु शकतो, याची हृदयद्रावक प्रचिती आज कोरची तालुक्यातील बोडेना गावात आली. हवा असलेला चॅनल बघण्याच्या अट्टाहासात दोन बहिणींमध्ये रिमोटची ओढाताण झाली आणि रिमोट मिळाला नाही म्हणून लहान बहिणीने रागाच्या भरात घरामागील झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सोनाली आनंद नरोटे (१०) असे मृत बालिकेचे नाव आहे.
बोडेना येथील आनंद नरोटे यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. १२ वर्षीय मोठ्या मुलीचे नाव संध्या. तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेली सोनाली. तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान भाऊ सौरभ आणि सर्वांत धाकटा शिवम. संध्या, सोनाली व सौरभ हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा या गावातील एका खासगी आश्रमशाळेत शिकत आहेत. घरी आई मंगला आणि शिवम राहत होते. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने संध्या, सोनाली आणि सौरभ गावी आले आहेत.
आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास सोनाली आणि संध्या टीव्ही बघत होत्या. आवडतं चॅनल पाहण्याच्या हट्टातून दोघींमध्ये रिमोटची ओढाताण झाली. रिमोट संध्याच्या हातात गेला. यामुळे सोनाली नाराज झाली. त्यानंतर ती घराच्या मागे गेली आणि पेरुच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून तिने जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश ठाकरे, उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात डॉ.राहुल राऊत यांनी सोनालीच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. आवडतं चॅनल पाहू दिलं नाही, असं प्राथमिक कारण पोलिस तपासात पुढे आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकारामुळे बालकांच्या मानसिकतेविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित होत आहे. समाजाने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी संवाद आणि संवेदनशीलतेची भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता व्यकत केली जात आहे.