

Gadchiroli Bhendala Anti-land acquisition protest 2026
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात जेएसडब्लू कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज भेंडाळा येथे जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाची होळी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. जेएसडब्लू कंपनीच्या स्टील उद्योगासाठी जमिनी अधिग्रहण करण्यासंदर्भात राज्य शासनाने ११ फेब्रुवारीला आदेश निर्गमित केला. या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शासनावर गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने खरेदी करुन त्यांना भूमिहीन करण्याचे काम शासन जाणीवपूर्वक करु पाहत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांना विश्वासात न घेता आणि पर्यावरणविषयक परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका करुन ब्राम्हणवाडे यांनी शासनाने आदेश तत्काळ मागे घेतला नाही तर सर्व शेतकरी १२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक मुंडन करुन धरणे आंदोलन करतील, असा इशारा दिला.
या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, दिवाकर निसार, ढिवरु मेश्राम, दिगंबर धानोरकर, विजय लाड, नारायण बांगरे, सदानंद जवादे, पांडुरंग भर्रे, संजय खेडेकर, भुवनेश्वर चौधरी, धनराज पोरेटे, मनोहर तुंबडे, उमाजी ठाकूर, काशिनाथ चौधरी, रोहिदास धोबे, गुरुदास चौधरी, कैलास सातपुते, विकास रायसिडाम, नीळकंठ कुथे, मारुती उमलवार, नरेंद्र जुवारे, कुंदा जुवारे, सुनील कन्नाके, नवनाथ चौधरी, संजय चलाख, दामोधर आभारे, मधुकर ढोबे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.