

Gadchiroli Illegal Diesel Seized
गडचिरोली : पेट्रोल व डिझेलची टंचाई असताना अवैधरित्या डिझेलची वाहतूक करताना आष्टी पोलिसांनी एका जणांकडून १६०० लीटर डिझेलसह सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी किशोर विश्वजित बिस्वास, रा.देवनगर, ता.मुलचेरा यास पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी (दि.३१) आष्टी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून काही ड्रम वाहून नेले जात असताना दिसले. गांधीनगर येथून आनंदग्राममार्गे मुलचेराकडे हा ट्रॅक्टर जात होता. पोलिसांनी हे वाहन थांबवून तपासणी केली असता दोन लोखंडी ड्रममध्ये ४०० लीटर आणि ५ प्लॉस्टिक बॅरलमध्ये ११९९ लीटर असा एकूण १६०० लीटर डिझेल आढळून आला.
बाजारात या डिझेलची किंमत १ लाख १९ हजार ६० रुपये एवढी आहे. पोलिसांनी हे डिझेल आणि ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण ७ लाख ५८ लाख ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक किशोर बिस्वास यास विचारणा केली असता त्याच्याकडे डिझेल वाहतुकीसंबंधी कोणताही वाहतूक परवाना किंवा संबंधित विभागाची परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी किशोर बिस्वास याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.
पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी, हर्षवर्धन बी.जे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम व अंमलदारांनीही ही कारवाई केली.