

Deulgaon Tiger attack elderly women
गडचिरोली : गावानजीकच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोन वृद्ध महिलांना वाघाने ठार केले. ही घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुटी गावानजीकच्या जंगलात उघडकीस आली. मुक्ताबाई नेवारे (वय ७०) व अनुसया वाघ (वय ७०) अशी मृत महिलांची नावे आहेत.
मुक्ताबाई नेवारे ह्या बुधवारी सकाळी गावापासून काही अंतरावरील जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, वाघाने त्यांना ठार केले. अनुसया वाघ ह्या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईक विविध ठिकाणी त्यांचा शोध घेत होते. अशातच काल रात्री गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडी परिसरात मृत प्राण्याचा उग्र वास येऊ लागल्याने नागरिकांनी त्या भागात जाऊन पहिले असता अनुसया वाघ यांचा मृतदेह आढळला.
तर काही अंतरावरच मुक्ताबाई नेवारे यासुद्धा मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिस पाटलाने आरमोरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा केला. वनविभागाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहचले. वाघाने दोन महिलांना ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. सध्या धान कापणी व मळणीचा हंगाम असल्याने जंगल परिसरातील शेतावर कसे जावे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.