

Armori Leopard Attack
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात दहशत माजवून दोन महिलांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गुरूवारी (दि.११) यश आले. बिबट्याने महिनाभरापासून देऊळगाव परिसरात दहशत निर्माण केली होती. अखेर बिबट्याला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
१९ नोव्हेंबरला या बिबट्याने देउळगाव आणि २ डिसेंबरला इंजेवारी येथील एका महिलेला ठार केले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि संताप निर्माण झाला होता. बिबट्याचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आ.रामदास मसराम, माकप नेते अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे नेते राज बन्सोड यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व पुरुषांनी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन केले होते. त्यानंतर वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी.आर., सहायक वनसंरक्षक आर.एस.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण बडोले यांच्या नेतृत्वात बिबट्याला पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.
वडसा वनविभाग आणि गडचिरोली येथील जलद प्रतिसाद पथकाच्या कर्मचाऱ्यांनी २५ ट्रॅप कॅमेरे, ५ लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे आणि २ अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मोहीम राबवून आज सकाळी बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मृणाल टोंगे यांनी बिबट्याची तपासणी करुन प्रथमोपचार केल्यानंतर त्याला नागपुरातील गोरेवाडा येथील प्राणीसंग्रहालयात रवाना करण्यात आले.
या मोहिमेसाठी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे, जीवशास्त्रज्ञ रवींद्र चौधरी, ललीत उरकुडे, जलद प्रतिसाद पथकाचे भाऊराव वाढई, अजय कुकुडकर, मकद अली सय्यद, निखिल बारसागडे, कुणाल निमगडे, गुणवंत बाबनवाडे यांनी सहकार्य केले.