

Aheri Road Protest
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील खांदला–चिरेपल्ली–मरनेली-आलापल्ली रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी ठोस आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२३) तिसऱ्या दिवशी संध्याकाळी समाप्त करण्यात आले.
खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते आलापल्ली हा सुमारे २२ किलोमीटरचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात पाच गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्कही तुटतो. रस्त्याअभावी गेल्या तीन वर्षांत चिरेपल्ली व मरनेली परिसरातील चार नागरिकांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता.
या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे बुधवारी २१ ऑक्टोबरला चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम, मरनेली इत्यादी गावांतील शेकडो पुरुष, महिला आणि मुले २२ किलोमीटरची पदयात्रा करीत अहेरीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहचले. तेथेच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. आज तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तीन महिन्यांत निविदा काढून रस्त्याचे काम सुरु केले जाईल, असे लेखी आश्वासन पालकर यांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.
आंदोलनस्थळीच भरविले वर्ग
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आंदोलनस्थळीच विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहेत. गावातील एका सुशिक्षित महिलेची मुलांना शिकविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या हक्कांसाठी लढा देतानाच मुलांचे शिक्षणही खंडित होऊ नये, या भूमिकेतून ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार लक्षवेधी ठरत आहे.