

Gadchiroli : A senior clerk in the police department was seriously injured
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
येथील जिल्हा व सत्र न्यायालय चौकात आज (मंगळवार) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल हायवा ट्रकखाली आल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७) रा. मुरखळा हे गंभीर जखमी झाले. वासनिक यांचा डावा पाय जखमी झाला आहे. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे.
आज सकाळी विलास वासनिक हे कार्यालयाकडे जात असताना त्यांची मोटारसायकल एमएच-३४ एम-८९७० क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली सापडली. यात त्यांचा डावा पाय पूर्णतःचेंदामेंदा झाला. अपघातानंतर विलास वासनिक यांना शहर पोलिसांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तातडीने उपचारानंतर त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हेलिकॉप्टरमार्फत हलवण्यात आले आहे.
जखमी वासनिक यांचा मुलगा बाबासाहेब वासनिक हा देखील पोलिस दलात कार्यरत असून, सध्या कोठी पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर आहे. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे घटनेचा तपास करीत आहेत.
प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत वासनिक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती चिंताजनक असल्याने देशमुख यांनी वासनिक यांना हेलिकॉप्टरने नागपूरला नेण्याची व्यवस्था केली. देशमुख यांच्या संवेदनशीलतेचे पोलिस दलासह सामान्य नागरिक कौतूक करीत आहेत.