गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार असून, आरमोरी विधानसभा क्षेत्रात २३, गडचिरोलीत २६ आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
निवडणूक निरीक्षक राजेंद्रकुमार कटारा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज मतमोजणी व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्धरित्या पार पाडण्याची सूचना त्यांनी केली. आरमोरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी देसाईगंज येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, तर अहेरीची मतमोजणी नागेपल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.
आरमोरी मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २३ फेऱ्या, टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीचे ९ टेबल व ईटीपीबीएस च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८८ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत. गडचिरोली मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २६ फेऱ्या, टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीचे १० टेबल व ईटीपीबीएस च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८० मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत. अहेरी मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ इव्हीएम टेबल, २२ फेऱ्या, टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीचे ९ टेबल व ईटीपीबीएस च्या मोजणीसाठी २ टेबल राहणार आहेत. यासाठी एकूण ८९ मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्राच्या सभोवताल सुरक्षा रक्षक तैनात असून यात १०० मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत.