Gadchiroli Naxalites News | पूर आलेले ५ नाले ओलांडत दोनशे कमांडोंनी केला १२ नक्षल्यांचा खात्मा

वांडोली गावानजीक पोलिस - नक्षल्यांमध्ये बुधवारी चकमक
Gadchiroli Naxalites News
File Photo
Published on
Updated on
जयंत निमगडे

गडचिरोली : घनदाट जंगलातून पायवाटेने मार्गक्रमण करीत, धो-धो बरसणारा पाऊस झेलत आणि पूर आलेले पाच नाले ओलांडत गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाच्या दोनशे कमांडोंनी १२ सशस्त्र नक्षल्यांचा खात्मा केला. ही चित्तथरारक गोष्ट आहे बुधवारी वांडोली गावानजीक पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीची. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षली शहीद सप्ताह साजरा करतात.

Gadchiroli Naxalites News
Gadchiroli News|गडचिरोली राज्यातील सर्वात अग्रेसर जिल्हा असेल : देवेंद्र फडणवीस

सी-६० पथकाची दुसरी चमू नक्षलविरोधी अभियानावर

त्याअनुषंगाने हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षली एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरातील वांडोली गावानजीक एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सकाळीच पोलिसांनी रणनीती आखली. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे एका लोह कारखान्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत दुपारी आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी सी-६० पथकाचे काही जवान भर पावसात तैनात होते, तर सी-६० पथकाची दुसरी चमू नक्षलविरोधी अभियानावर निघाली होती.

Gadchiroli Naxalites News
गडचिरोली : १६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षली महिलांचे आत्मसमर्पण

सकाळपासूनचा चित्तथरारक प्रवास

बुधवारी सकाळी ६ वाजता नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे दोनशे कमांडो अभियानावर निघाले. धो-धो बरसणारा पाऊस झेलत, घनदाट जंगलील पायवाटेने जात आणि पूर आलेल्या ५ नाले ओलांडत हे जवान सोहगावजवळ पोहचले. तेथून वांडोली परिसरात जाऊन शोधमोहीम सुरु असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही सतर्क होत जोरदार प्रत्युत्तर दिले. नक्षलवादी अग्निशस्त्रे आणि एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह पोलिसांवर मारा करीत होते, तर पोलिसही तेवढ्याच ताकदीने नक्षल्यांचा मुकाबला करीत होते. जवळपास सहा तास चकमक चालल्यानंतर ती रात्री ७ वाजता संपली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ७ पुरुष आणि ५ महिला अशा १२ नक्षल्यांचे मृतदेह हाती लागले.

Gadchiroli Naxalites News
गडचिरोली : ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी

अत्याधुनिक शस्त्रे जप्त

घटनास्थळी ११ अग्निशस्त्रे, ३ एके-४७, २ इन्सास रायफल, १ कार्बाईन, १ एसएलआर, स्फोटके, डिटोनेटर्स, बीजीएल आढळून आली आहेत. यानंतर तेथे नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

तीन वर्षांत ८० नक्षली ठार

मागील तीन वर्षांत ८० जहाल नक्षल्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. १०२ नक्षल्यांना अटक करण्यात आली, तर २९ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. २२ जुलैला नक्षल्यांच्या दंडकारण्य समितीचा सचिव गिरीधर याने आत्मसमर्पण केले होते. हा मोठा धक्का होता.

Gadchiroli Naxalites News
गडचिरोली : डुम्मे नाल्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू

तीन वरिष्ठ नक्षल्यांचा खात्मा

या चकमकीत चातगाव-कसनसूर संयुक्त दलमचा प्रभारी आणि विभागीय समिती सदस्य योगेश तुलावी, कोरची-टिपागड दलमचा प्रभारी तथा विभागीय समिती सदस्य विशाल आत्राम, टिपागड दलमचा प्रभारी तथा विभागीय समिती सदस्य प्रमोद कचलामी या प्रमुख नक्षल्यांचा समावेश आहे, शिवाय चातगाव-कसनसूर दलमचा उपकमांडर महारु गावडे(३१), कोरची-टिपागड दलमचा उपकमांडर अनिल दर्रो(२८), कसनसूर-चातगाव दलमचा एरिया कमिटी सदस्य विज्जू(रा.बस्तर, छत्तीसगड), सरिता परसा(३७),रज्जो गावडे(३५), रोजा(बस्तर,छत्तीसगड), सागर(बस्तर,छत्तीसगड ), चंदा पोडयाम(अबुझमाड, छत्तीसगड) व सीता हवके(२७) हेदेखील ठार झाले आहेत. या सर्वांवर एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस होते.

Gadchiroli Naxalites News
गडचिरोली : माओवाद्यांचा स्फोटाचा प्रयत्न फसला, दोन जवान जखमी

दोन दलमचा संपूर्ण सफाया: पोलिस अधीक्षक

वांडोली येथील चकमकीत १२ नक्षली ठार झाल्यामुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एलओएस आणि चातगाव-कसनसूर या नक्षल्यांच्या दोन दलमचा संपूर्ण सफाया झाल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील, हवालदार शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे जखमी झाले. त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु असून, तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, एम.रमेश उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news